Sunday, May 14, 2006



...गाणं ऐकण्यात मी अगदी गुंग होऊन गेलो होतो.माझ्या आवडीच्या भक्तिगीतांपैकी एक... सुधीर फडके ह्यांचे ते आर्त स्वर,आणि एकाहून एक सुरेख कडवी...विशेषतः शेवटचं कडव्याचं शेवटच वाक्यं तर...अहाहा !

"...अवती भवती असून दिसेssना, शोधीतोस आकाशीss.."


....टिंग,टिंग, पुन्हा ती बसची घंटी वाजली आणि मी भानावर आलो.अचानक गलबलाट ऐकू आला.त्या थांब्यावर बसमध्ये बरीच माणसं चढली.मग लक्षात आलं की आज संकष्टी आहे आणि स्टॉप सिद्धीविनायकचा आहे,मग स्वतःशीच म्हटलं,"साहजिकच आहे...."

बरं,पुन्हा गाणं ऐकावं म्ह्टलं तर MP3 प्लेअर मधले सेल पण संपत आले होते, नाईलाजाने तो बंद केला आणि खिडकीबाहेर बघायला लागलो.

"..अरे,ह्या वेळी जमलं नाही, गेल्या महीन्यात चालत आलो होतो रे सिद्धीविनायकाला अंधेरीहून..छ्या ! ", माझ्या मागच्या खिडकीतल्या प्रवाशाचा ह्या वाक्याने मी जरा चमकलोच.अंधेरी ते सिद्धिविनायक म्हणजे निदान २०-२२ किलोमीटर तरी सहज असेल...

"कसं काय मॅनेज करता तुम्ही? " त्याचा सहप्रवासी.

"..अरे रात्री निघायचं,पहाटे पर्यंत पोहोचतो, आरती करायला मिळते,मग घरी जायचं आणि झोपायचं "

"आणि मग कामावर जायच काय ? "

" हाफ़-डे टाकायचा,कंटाळा आला तर दांडी ! "

"हा हा हा" असं म्हणत एका टाळीची देवाणघेवाण झाली.

"चल, माझा स्टॉप येईल, आज गर्दी फ़ार आहे, आत्ताच उठलो तर उतरायला मिळेल.चल निघतो.." असं म्हणून तो उठला आणि निघून गेला...

माझी पुन्हा एकदा तंद्री लागली आणि स्वगत चालू झाले.

... मध्यंतरीच्या सुमारास ऐश्वर्यापण आली होती ना सिद्धीविनायकाच्या देवळात.हो,बरोबर,सलमानखान बरोबर काहीतरी वाजलं होतं तेंव्हा...खरंतर दादरचा सिध्दिविनायक काय, पुण्यातला दगडूशेठ हलवाई काय किंवा घराच्या बाजूला असलेल्या अगदी छोट्याश्या देवळातं कायं, आपल्याला बुवा त्या गणपतीचं रूप तितकच निराकार आणि तेजस्वी दिसतं...मग नकळत हात जोडले जातात आणि अगं शहारून जातं...

...पण अरे आजकाल कदाचित मंदीरात जाणं हीच एक फ़ॅशन झालीय.आमच्या वयाच्या पोरांनाही बर चालतं. पोरगं मंदीरात जातय म्हणून घरी आईबाबा खूश आणि " ...राहूल हर ट्यूसडे के ट्यूसडे मंदीर जाता है "असं म्हणत मैत्रिणीही स्वतः राणी असल्यासारखी राहूलची तारीफ़ करतात !!
आणि आपला राहूल तर ह्या सगळ्यांच्या वरचढ, तो राणीला सोडून मंदीरातही दुस-या कुण्या पट्टराणीच्या शोधात असतो...एकंदरीतच सगळं छान चाललेलं असतं !

..पण काही म्हण अशी ही काही देवस्थानं सुप्रसिद्ध आणि काही देव मंदीरात भाविकांची वाट पहात तसेच उभे.लोकांना अशा गर्दीतल्या देवांना भेटण्याची हौस पण फ़ार...काय तर म्हणे, ती देवस्थानं जागृत असतात !! पण जागृत देवस्थानं ही सुद्धा एका प्रकारची अंधश्रद्धाच ना रे ! म्हणजे हे बरयं , एक देवस्थान जागृत आणि दुस-या देवळातला देव काय झोपा काढतोय ?काहीही !!.. आणि ह्या देवळात जाऊन आपण करतो काय ? तर,प्रथेनुसार आपण नारळ हार् तुरे विकत घेतो आणो वहातो.त्यांचही नंतर काय होतं हे बघून आपणच हळहळतो...छे !! ह्याबाबतीत आमच्या पेठेकाकांचे हे शब्द मनाला स्पर्शून जातात," असं सगळं घेण्यापेक्षा दानपेटीत ते पैसे दान करावेत,छोट्या देवालयांमध्ये हे पैसे देवळांची निगा राखण्यासाठी किंवा तिथल्या पुजा-याच्या चरितार्थ चालवण्यास वापरले जातात.आणि मोठी देवालयं अनेक गरजू संस्थांना,विद्यार्थ्यांना मदत करतात." ... मोठया झाडाची सावली कधी कधी अनाहूतपणॆ सुखावून जाते...

.....आधीच आजच्या धावपळीच्या जीवनात आपला फ़ार कमी वेळ आपल्या कुटुंबासमेवत जातो आणि पर्यायाने एकमेकातला संवाद कमी होतोय.आपल्यामधल्या कलागुणांना वाव देणं किंवा छंद जोपासण हे तर दूरच राहीलयं."पोटापण्याचा उद्योग तर हवाच.पण नाटक,गाणं ,कविता, अशा एखाद्या कलेशी नातं ठेवा.पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील आणि कलेशी असलेलं नातं जगायाचं कशासाठी ते सांगेल... ",पुलंचे हे शब्द आपण इमेल मध्ये वाचले आणि अहाहा म्हटलं की संपल सगळं....अशा देवालयांमध्ये गर्दी करण्यापेक्षा पुलंनी म्हटल्याप्रमाणे काहीतरी करावं.

....देवळातून जेंव्हा नियमीतपणे येणा-या एखाद्या भक्ताचे चप्पल चोरीस जातात, तेंव्हा त्या विध्यात्याला कदाचित हेच सुचवायच असेल."बाबारे, माझ्या दर्शनासाठी इथे येण्याची काही गरज नाही,माझं अस्तित्व सगळीकडे आहे.तू आपला घरीच बरा,नाहीतरी घरीसुद्धा देव्हारा आहेच ना !"

पण त्या मंदीरातल्या गोंगाटामध्ये त्याचे हे हळुवार सत्य आपल्याला ऐकूच येत नाही...मगं नाईलाजाने त्यालाही हेच सत्य ओरडून सांगावं लागतं आणि मग होते पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रीसुद्धा चेंगराचेंगरी! जातात शेकडो भाविकांचे प्राण! पण तरीही त्याचे शब्द आपल्या कानात पडत नाहीत ते नाहीच.त्याला त्याचाही नाईलाज असतो...

टींग टींग ! पुन्हा एकदा त्या घंटीच्या आवजाने माझी तंद्री भंग केली.आता माझाही थांबा आला होता..

आणि मलाही आता थांबायला हवं...

पण जाता जाता अशीच एकच छोटीसी गोष्ट आठवली ती सांगतो,
मिर्झा गालीब की आणि कुणी उर्दू शायर एकदा त्याच्या आयुष्याला पार वैतागलेला असतो. त्याच वैफल्यग्रस्त अवस्थेत तो मशिदीमध्ये मद्य घेऊन जातो आणि शांतपणे बसून तो मद्य प्यायला सुरवात करणार इतक्यातच तिथे त्याचा एक मित्र येतो.तो ह्याला अडवून म्हणतो."अरे, ये तो मस्जिद है । अल्ला का घर ! और तुम यहापे बैठके शराब कैसे पी सकते हो ?".

ह्यावरचा त्याचा प्रतिसाद बरच काही सांगून जातो. तो म्हणतो,

" साथी शराब पी ने दे,
मुझे मस्जिदमे बैठकर.
या फ़िर ऐसी जगह बता दे,
जहापे खुदा नही है... "

.....शेवटी हेच खरं !